॥ संस्कृतभारती ॥

मराठीत वाचा Read in English

संस्कृतभारती (संस्कृत ही लोकभाषा व्हावी!)

# पार्श्वभूमी--

१९८१ साली बेंगळुरूमध्ये चार संस्कृत शिक्षकांनी एका संस्कृत आंदोलनाची सुरुवात केली. त्या आंदोलनाचा आधार असलेल्या स्वयंसेवी संघटनेचे नाव आहे—संस्कृतभारती.

इंग्रजी काळात भारतात संस्कृत हे 'व्याकरण-भाषांतर' पद्धतीने (Grammar-translation Method) शिकवले जाऊ लागले. त्यातही केवळ भाषांतर लिहिण्यावरच सर्व भर दिला जाई. त्या पद्धतीमुळे विद्यार्थी केवळ भाषांतर करायला शिकतात, 'संस्कृत भाषा' शिकत नाहीत. या पद्धतीत व्याकरणाचे कठीण नियम निरर्थकपणे पाठ केल्यामुळे विद्यार्थी संस्कृताध्ययनाबाबत निरुत्साही होऊन संस्कृत सोडून देतात. त्यामुळे संस्कृत शिकणाऱ्या आणि शिकवणाऱ्यांची संख्या दिवसागणिक कमी होत चालली होती. हे सर्व पाहून, 'संस्कृतच्या पुनरुत्थानासाठी कोणता उपाय योजावा?' या विचारात हे शिक्षक मग्न झाले.

वास्तविक पाहता, संस्कृत ही एकेकाळी आपली मातृभाषा तसेच ज्ञानभाषा देखील होती. कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत लोक व्यवहाराची भाषा म्हणून संस्कृतचाच उपयोग करत असत. स्थापत्य, खगोल, रसायन, ज्योतिष, योग, आयुर्वेद, राज्यशास्त्र इत्यादी अनेक व्यवहारोपयोगी शास्त्रे संस्कृतमध्येच विकसित झाली होती. संस्कृतमधील काव्ये आणि नाटके आपल्या संस्कृतीचा परिचय करून देणारी असून त्यांच्या साहित्यिक गुणांमुळे ती संपूर्ण जगात प्रशंसित आहेत.

एवढेच नव्हे तर, संपूर्ण भारताला राष्ट्र म्हणून एका सूत्रात बांधणे केवळ संस्कृतमुळेच शक्य आहे. कारण इंग्रजी ही परकीय भाषा आहे आणि हिंदी देखील सर्वमान्य नाही. त्यामुळे राष्ट्रनिर्माणासाठी त्या दोन्ही भाषांमध्ये तितके सामर्थ्य नाही जितके संस्कृतमध्ये आहे. संपूर्ण देशात संस्कृतबद्दल प्रेम असून संस्कृत जाणून घेण्याची, शिकण्याची आणि व्यवहारात वापरण्याची लोकांची इच्छा आहे. तरीही, वर सांगितल्याप्रमाणे संस्कृत शिकवण्याची पद्धत अनुकूल नसल्यामुळे संस्कृत शिकण्यासाठी प्रवृत्त होणारे लोक दुर्मिळ आहेत. मग काय करावे? कोणता मार्ग निवडावा? कोणता उपाय आहे?

जी बोलली जाते ती भाषा.जर भाषा लोकांच्या मुखात नसेल, तर तिचे भाषा असणेच संपून जाते. म्हणून, ज्याला 'भाषा' म्हणता येईल अशी वस्तू  व्यवहारासाठी सर्वप्रथम लोकांच्या मुखात असली पाहिजे.

भाषा शिकण्याचा नैसर्गिक क्रम कोणता असावा, याचा विचार केल्यास आपल्या मराठी, कन्नड इत्यादी मातृभाषा शिकण्याचा बालपणापासूनचा क्रम आठवा. सर्वात आधी आपण मातृभाषा कशी शिकलो? आपली आई जे शब्द बोलायची, त्यांचे अनुकरण करूनच आपण मातृभाषा शिकलो. तिथे व्याकरण नव्हते किंवा भाषांतरही नव्हते. म्हणून, भाषा शिक्षणाच्या नैसर्गिक क्रमातील पहिली पायरी म्हणजे श्रवणानुगामी उच्चारण (ऐकून उच्चारणे). त्यानंतर आपण थेट संभाषण करायला सुरुवात केली. जेव्हा शाळेत जाण्याचे वय झाले, तोपर्यंत आपण संभाषणात बऱ्यापैकी सरावलेले होतो. शाळेत प्रवेश केल्यानंतर लिपिज्ञान आणि लेखन-वाचन सुरू झाले.

संस्कृत शिक्षणातही भाषाज्ञानाचा हा नैसर्गिक क्रम स्वीकारला पाहिजे. तेव्हाच संस्कृत शिकणे सोपे, सुकर, औचित्यपूर्ण, आवडीचे आणि सामर्थ्ययुक्त होईल, असा विचार करून त्या चार शिक्षकांनी 'संभाषण माध्यमा'तून संस्कृत शिकवण्याचे प्रयोग सुरू केले. त्यांच्या सततच्या प्रयत्नांचे फळ म्हणजे संस्कृतभारतीचा 'दहा दिवसांचा संभाषण वर्ग' हा पाठ्यक्रम होय. या वर्गात संस्कृत थेट संभाषणाच्या माध्यमातूनच शिकवले जाते. यामुळे पहिल्या दिवसापासूनच लोक संस्कृतमध्ये संभाषण करायला सुरुवात करतात.

१९८१ साली सुरू झालेले हे कार्य हळूहळू वाढत जाऊन, बीजाचा वटवृक्ष व्हावा तसे मोठ्या रूपात परिवर्तित झाले आहे. संस्कृत ही लोकभाषा व्हावी हे संस्कृतभारतीचे अंतिम ध्येय आहे. त्यासाठी गेली पंचेचाळीस वर्षे संस्कृतभारती अविरत प्रयत्नशील आहे.

# संस्कृतभारतीचे आयाम--- 

सध्या संस्कृतभारती पंधरा विभागांच्या (कार्य-आयामांच्या) माध्यमातून संस्कृत प्रचाराचे कार्य करते--

    1. संभाषण वर्ग
    2. भाषाबोधन वर्ग
    3. प्रबोधन वर्ग
    4. शिबिरचालक प्रशिक्षण वर्ग
    5. संवादशाळा
    6. गीताशिक्षण केंद्र
    7. बालकेंद्र
    8. सरल परीक्षा
    9. पत्राचार (पत्राद्वारे) संस्कृत
    10. पुस्तक प्रकाशन
    11. संस्कृत प्रदर्शनी
    12. संस्कृत पुस्तक मेळावा
    13. संस्कृत सम्मेलने
    14. साप्ताहिक मेलने
    15. श्लोकपठन केंद्र आणि श्लोकपठन स्पर्धा
  • आपण संभाषण वर्गाविषयी थोडे जाणून घेतलेच आहे. त्यानंतरची पायरी म्हणजे भाषाबोधन वर्ग. या तीन दिवसांच्या निवासी वर्गात संभाषणाला अनुकूल असे व्याकरण शिकवले जाते. 
  • त्यानंतर दहा दिवसांच्या प्रबोधन वर्गात याचीच उच्चस्तरीय पुनरावृत्ती होते. 
  • त्यानंतर दहा दिवसांचा शिबिर चालक प्रशिक्षण वर्ग असतो. हा वर्ग दरवर्षी मे महिन्यात होतो. तिथे संभाषणाचा सराव असलेल्यांना स्वतः संभाषण वर्ग कसा चालवावा याचे प्रशिक्षण दिले जाते.
  • जे लोक संभाषण वर्गांत सहभागी होऊ शकत नाहीत, ते संवादशाळेत जाऊन संभाषण शिकू शकतात. दिल्ली आणि वाराणसी या दोन ठिकाणी वर्षभर सातत्याने संवादशाळा चालवल्या जातात. प्रत्येक महिन्यात दोनदा संवादशाळा असते (१ ते १४ तारीख आणि १६ ते २९ तारीख). १६ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती यात सहभागी होऊ शकते.
  • भगवद्गीता शिकण्याची इच्छा असलेले लोक गीताशिक्षण केंद्रांमध्ये गीता अध्ययन करतात. त्यासाठी गीतासोपानम् नावाचा स्वतंत्र अभ्यासक्रम संस्कृतभारतीने तयार केला आहे.
  • लहान मुले खेळ आणि गाण्यांच्या माध्यमातून बालकेंद्रांमध्ये मनोरंजक पद्धतीने संस्कृत शिकतात. 
  • ज्या शाळांमध्ये संस्कृत शिकण्याची व्यवस्था नाही, तिथे शालेय विद्यार्थी सरल परीक्षांच्या माध्यमांतून संस्कृत शिकू शकतात.
  • जे लोक कामाच्या व्यापामुळे संभाषण वर्ग किंवा संवादशाळेत येऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी घरी बसूनच पत्राचाराद्वारे (Postal Correspondence)  संस्कृत शिक्षणाची व्यवस्था केली आहे.
  • प्राचीन शास्त्रांची आधुनिक काळातील उपयुक्तता दर्शवण्यासाठी संस्कृत प्रदर्शने संस्कृतभारतीद्वारे वेळोवेळी आयोजित केली जातात. 'संस्कृतातील विज्ञान', 'कौटिलीय अर्थशास्त्र' इत्यादी त्याचे विषय असतात.
  • संस्कृत पुस्तकांच्या प्रसारासाठी संस्कृत पुस्तक मेळावे देखील आयोजित केले जातात. 
  • लोकांना संस्कृतकडे आकर्षित करण्यासाठी वेळोवेळी  संस्कृत सम्मेलने भरवली जातात.या सम्मेलनांचे एक त्रैवार्षिक चक्र आहे: पहिल्या वर्षी जिल्हा स्तरावरील सम्मेलने, दुसऱ्या वर्षी प्रांत कार्यकर्ता सम्मेलन आणि तिसऱ्या वर्षी अखिल भारतीय कार्यकर्ता सम्मेलन होते.
  • सुभाषिते आणि स्तोत्रे शिकण्याचे आकर्षण आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून सुभाषितांच्या आणि स्तोत्रांच्या माध्यमातून संस्कृत शिक्षणाची सोय श्लोकपठनकेंद्रांमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. श्लोकशिक्षण आयामाद्वारे दरवर्षी श्लोकपठन स्पर्धांचे देखील आयोजन केले जाते.

# नि:शुल्क कार्य--

या सर्व उपक्रमांचे आयोजक निस्वार्थी बुद्धीने आणि समाजहिताच्या भावनेने कार्य करणारे संस्कृतभारतीचे कार्यकर्ते आहेत. संस्कृतभारतीचा कार्यकर्ता कार्य करताना स्वतःसाठी कोणतेही शुल्क किंवा वेतन घेत नाही. संस्कृतचे अध्यापन नेहमी निःशुल्क (मोफत) असते. जिथे भोजन-निवास इत्यादी व्यवस्था आवश्यक असते, तिथे केवळ त्या व्यवस्थेसाठी नाममात्र धन स्वीकारले जाते.

# कार्याचे फलित-- 

या प्रयत्नांची फलिते खालीलप्रमाणे आहेत--

  • सध्या भारतात मिझोराम, काश्मीर सारखी काही राज्ये वगळता सर्वत्र संस्कृतभारतीचे कार्यकर्ते आहेत. संपूर्ण देशात संस्कृतभारतीची एकूण ४५०० केंद्रे आहेत.
  • भारताबाहेर २६ देशांमध्ये संघटनेच्या कार्याचा विस्तार झाला आहे
  • आतापर्यंत १ कोटी लोकांना संस्कृतभारतीने संस्कृत संभाषणाचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच १ लाख संस्कृत शिक्षकांना संभाषणाच्या माध्यमातून संस्कृत शिकवण्याचे प्रशिक्षण दिले आहे.
  • भारतात चार गावे (खेडी) 'संस्कृत ग्राम' म्हणून विकसित झाली आहेत, जिथे लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण संस्कृतला मातृभाषा मानून त्यातच संभाषण करतात.
  • एकूण ६००० कुटुंबे ही 'संस्कृत कुटुंबे' झाली आहेत, जिथे घरातील सर्व सदस्य संस्कृतमध्येच बोलतात.
  • संस्कृतभारतीद्वारे सुरू असलेल्या या संस्कृत-चक्रप्रवर्तनाला साहाय्य करून, आपण संस्कृतला लोकभाषेत रूपांतरित करू या आणि भारताला विश्वगुरू म्हणून पुन्हा प्रस्थापित करू या.

जयतु संस्कृतम्। जयतु भारतम्।


Scan to share this page
QR Code