मराठीत वाचा
Read in English
संस्कृत भारतीच्या श्लोकशिक्षण आयामतर्फे चालवला जाणारा 'श्लोकपठनकेंद्र' हा एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. ही केंद्रे समाजामध्ये तसेच शाळांमध्येही प्रभावीपणे चालवता येतात. या उपक्रमाची सविस्तर माहिती खालील पाच मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊ या.
१. उपक्रमाची ओळख--
संस्कृत भाषेचा प्रसार व्हावा आणि संस्कारांची जपणूक व्हावी या उद्देशाने 'श्लोकपठन केंद्र' हा उपक्रम संस्कृतभारतीने सुरू केला आहे. संस्कृतच्या शुद्ध उच्चारणारणाचे कौशल्य तसेच सुभाषितांचे आणि स्तोत्रांचे ज्ञान शाळांमधील मुलांपासून ते समाजातील इतर सर्व घटकांपर्यंत पोहोचवणे हे या केंद्राचे मुख्य कार्य आहे.
- या केंद्रासाठी नेमून दिलेला अभ्यासक्रम हा या ब्लॉगवर उपलब्ध करून दिलेला आहे. हा एक पूरक अभ्यासक्रम (Supplimentary Curriculum) आहे. शाळांमध्ये तो वेगळा विषय म्हणून शिकवावा लागणार नाही.
- तो शाळेच्या नेहमीच्या कामकाजाला अडथळा न येता सुलभ पद्धतीने शिकविला जाऊ शकतो.
- तो नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी (NEP 2020) सुसंगत आणि स्तरित स्वरूपाचा आहे.
- श्लोकपठनकेंद्र हा उपक्रम चालविण्यासाठी शाळेने पुढाकार घेतला तर राष्ट्रिय शैक्षणिक धोरण राबवण्यामध्ये शाळेने केलेला विशेष प्रयत्न म्हणून तो गणला जाऊ शकतो.
२. पात्रता आणि प्रशिक्षण--
- पात्रता: हे केंद्र चालवणारी व्यक्ती संस्कृतच्या शुद्ध उच्चारणाची जाणकार असावी. यासाठी व्याकरणाचा गाढा अभ्यास असणे अनिवार्य नाही.
- प्रशिक्षण: ज्यांना संस्कृतचा पूर्वानुभव नाही, अशा व्यक्तीही हे केंद्र सुरू करू शकतात. मात्र, त्यांना संस्कृतभारतीचा १० दिवसांचा ऑनलाईन/ऑफलाईन संभाषण वर्ग आणि त्यानंतर जून ते डिसेंबर या काळात चालणारे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक असते. हे प्रशिक्षण दर शनिवारी १-२ तास सोप्या संस्कृतमधून आणि अत्यावश्यक असेल तिथे थोड्याफार मराठीचाही वापर करून घेतले जातात.
३. शालेय स्तरावरील नियोजन--
- केंद्र चालविण्यासाठी शाळेत संस्कृत हा विषय म्हणून शिकवला जात असणे अनिवार्य नाही. संस्कृत विषयाची आवड असणारे कोणतेही शिक्षक हे केंद्र सुरू करू शकतात.
- अंमलबजावणी-- महाराष्ट्र शासनाच्या 'आनंदी शनिवार' उपक्रमात किंवा दैनंदिन परिपाठातदेखील ही सुभाषिते व स्तोत्रे मुलांकडून म्हणून घेता येतात. ऑडिओ फाईल्स उपलब्ध असल्यामुळे ऑफ तासालाही मुले याचा सराव करू शकतात.
|
१) गूगल फॉर्म वापरून शिक्षक नोंदणी
|
|
२) संभाषण वर्ग आणि श्लोकपठन प्रशिक्षण
|
|
३) शाळेची परवानगी घेणे व वेळेचे नियोजन
|
|
४) ब्लॉगवरून ऑडिओ डाऊनलोड करणे आणि पेजेसच्या प्रिंट घेणे
|
|
५) श्लोकपठन केंद्राचा शुभारंभ
|
- अभ्यासक्रम बालवाटिकेपासून बारावीपर्यंत इयत्तांनुसार विभागलेला असून, एका इयत्तेचा अभ्यासक्रम एका शैक्षणिक वर्षात पूर्ण करणे अपेक्षित आहे.
- वयोगटानुसार विद्यार्थ्यांकडून खालील अध्ययननिष्पत्ती (Learning Outcomes) अपेक्षित आहेत--
| इयत्ता गट | अपेक्षित अध्ययननिष्पत्ती (Learning Outcomes) | कौशल्य विकास (Skill Development) |
|---|---|---|
| बालवाटिका ते ५ वी | श्लोकांचे लयबद्ध पठन आणि शुद्धोच्चारण. | उच्चारण स्पष्टता (Pronunciation Clarity) |
| इयत्ता ६ वी ते ८ वी | लयबद्ध पठन आणि सुभाषितांचा अर्थ सांगणे. | अर्थबोध (Comprehension) |
| इयत्ता ९ वी ते १२ वी | लयबद्ध पठन, अर्थकथन आणि स्वमत प्रकटन. | चिकित्सक विचार (Critical Thinking) |
- अभ्यासक्रमातील श्लोकांच्या आणि स्तोत्रांच्या ऑडिओ फाईल्स उपलब्ध आहेत.
- प्रत्येक १० सुभाषितांच्या गटाखाली फाईल्सची लिंक दिलेली आहे.
- फाईल्स डाउनलोड करून शिक्षक त्यांचा वर्गात सराव करू घेऊ शकतात.
Scan to share this page