संस्कृत श्लोकपठन–पूरक अभ्यासक्रम : एक अभिनव उपक्रम
राष्ट्रिय शैक्षणिक धोरण (NEP 2020) आणि राष्ट्रिय अभ्यासक्रम आराखडा (NCF 2023) यामध्ये शालेय स्तरावर संस्कृत-शिक्षण आणि मूल्य-शिक्षण यांच्यावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आहे. मूल्यशिक्षणाच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचा परिचय करून देण्यासाठी संस्कृतला शिक्षणामध्ये महत्त्वाचे स्थान असावे, ही बाब सैद्धान्तिक पातळीवर मान्य करण्यात आली असली, तरी तिचे क्रियान्वयन (Implementation) कसे करावे, याबद्दल शैक्षणिक क्षेत्रात संभ्रमाचे वातावरण आहे.
संस्कृतभारती ही स्वयंसेवी संस्था गेल्या ४५ वर्षांपासून भारत आणि जगातील २६ देशांमध्ये संस्कृतच्या प्रचारासाठी कार्यरत आहे. संस्कृतभारतीने संस्कृत शिकविण्यासाठी विकसित केलेली अभिनव अशी संभाषणात्मक पद्धत आज जगन्मान्य झाली आहे.
संस्कृत श्लोकवाङ्मय आणि त्यातील सुभाषिते आणि स्तोत्रे हा आपल्याला परंपरेने मिळालेला अनमोल ठेवा आहे. म्हणून शालेय विद्यार्थ्यांसाठी श्लोक आणि स्तोत्रे यांचा एखादा पूरक अभ्यासक्रम निर्माण करण्यासाठी संस्कृतभारतीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही प्रयत्नशील होतो. या प्रयत्नांचा परिपाक म्हणजे सदरचा अभ्यासक्रम होय.
# अभ्यासक्रमाची उद्दिष्टे--
या अभ्यासक्रमाची रचना करताना खालील मुख्य शैक्षणिक उद्दिष्टे (Educational Objectives) डोळ्यासमोर ठेवली आहेत–
1) सुभाषितांच्या माध्यमातून मुलांचे मानवी व्यवहाराचे ज्ञान वाढवणे
2) शुद्धोच्चारणाची क्षमता विकसित करणे
3) त्यांच्यामध्ये नम्रता, चारित्र्य व प्रामाणिकपणाचे संस्कार रुजवणे.
या उद्दिष्टांच्या सफलतेमुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळेल.
# स्तरित रचना–
1) राष्ट्रिय, शैक्षणिक धोरणाशी सुसंगतता– NEP 2020 मधील पायाभूत स्तर (Foundation), प्रारंभिक स्तर (Preparatory), मध्य स्तर (Middle) आणि माध्यमिक स्तर (Secondary) या चारही स्तरांचा विचार करून हा अभ्यासक्रम तयार केला आहे.
2) क्रमिक विकास– बालवाटिकेपासून बारावीपर्यंतच्या सर्व इयत्तांचा यात समावेश आहे.
3) शास्त्रीय रचना–अभ्यासक्रमाची रचना 'सोप्याकडून कठीणाकडे' (Simple to Complex) या सूत्रावर आधारित आहे.
# अभ्यासक्रमाची व्याप्ती–
1) अभ्यासक्रमात एकूण ५०० सुभाषिते, १२ स्तोत्रे आणि भगवद्गीतेचे १२ अध्याय इयत्तेनुसार समाविष्ट केले आहेत.
2) विद्यार्थ्याने बालवाटिकेपासून बारावीपर्यंत सलग पाठांतर केले, तर ही सर्व सुभाषिते, स्तोत्रे आणि अध्याय त्याला तोंडपाठ होतील आणि संस्कृतच्या ज्ञानाचा आयुष्यभर टिकणारा अमूल्य ठेवा त्याला प्राप्त होईल.
# अंमलबजावणीची पद्धत–
- हा अभ्यासक्रम पूरक (Supplementary) पद्धतीने लागू करायचा आहे. शाळांचे नियमित कामकाज न बिघडवता याचे अध्यापन करता येते.
- प्रत्येक शाळेमध्ये एक श्लोकपठन केंद्र स्थापन करून त्याद्वारे या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करायची आहे.
- शाळा आपल्या दैनंदिन कामकाजात कोणताही अडथळा येऊ न देता रोजच्या प्रार्थनेच्या वेळी किंवा ‘आनंदी शनिवार’ या उपक्रमांतर्गत दर शनिवारी श्लोकपठनाचे विशेष सत्र योजित करून अभ्यासक्रमाचे सहजगत्या क्रियान्वयन करू शकतात.
- श्लोकपठन केंद्रातल्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि पठनसातत्य टिकवून धरण्यासाठी संस्कृतभारती दरवर्षी श्लोकपठन स्पर्धा आयोजित करते. त्यातही शाळांना आपला सहभाग ऐच्छिकरीत्या नोंदवता येईल.
- श्लोकपठन केंद्र आणि श्लोकपठन स्पर्धा यांची माहिती पुढील पानांवर दिलेली आहे---