श्लोक ३३१ ते ३८०

शशिना च निशा निशया च शशी
शशिना निशया च विभाति नभः।
कविना च विभुर्विभुना च कविः
कविना विभुना च विभाति सभा।।३३१।।

चंद्राने रात्र शोभते आणि रात्रीमुळे चंद्र शोभतो; चंद्र आणि रात्र या दोघांमुळे आकाश उजळून निघते. त्याचप्रमाणे, कवीमुळे राजा (प्रभु) शोभतो आणि राजा मुळे कवी शोभतो; कवी आणि राजा या दोघांमुळे संपूर्ण सभा (दरबार) शोभून दिसते.

The night shines because of the moon, and the moon shines because of the night; both the moon and the night together illuminate the sky. Similarly, a leader shines because of the poet, and the poet shines because of the leader; both the poet and the leader together make the assembly brilliant.


काष्ठादग्निर्जायते मथ्यमानात्
भूमिस्तोयं खन्यमाना ददाति।
सोत्साहानां नास्त्यसाध्यं नराणाम्
मार्गारब्धाः सर्वयत्नाः फलन्ति।।३३२।।

लाकूड घासल्याने त्यातून अग्नी प्रगट होतो; जमीन खोदल्याने ती पाणी देते. उत्साही माणसांसाठी जगात काहीही साध्य करणे अशक्य नाही; योग्य मार्गाने केलेले सर्व प्रयत्न नक्कीच फळ देतात.

Fire is produced from wood when it is rubbed; the earth gives water when it is dug. For people with enthusiasm and determination, nothing is impossible; all efforts started in the right direction eventually bear fruit.

श्रुतिर्विभिन्ना स्मृतयश्च भिन्ना
नैको मुनिर्यस्य वचः प्रमाणम्।
धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां
महाजनो येन गतः स पन्थाः।।३३३।।

श्रुती (वेदांचे अर्थ) वेगवेगळे आहेत, स्मृतीग्रंथही परस्परांपासून भिन्न आहेत. असा एकही ऋषी-मुनी नाही ज्याचे शब्द सर्वांनाच अंतिम प्रमाण वाटतील. धर्माचे खरे तत्व हे अत्यंत खोल गुहेत दडलेले (अतिशय सूक्ष्म) आहे. त्यामुळे ज्या मार्गावरून थोर महात्मे गेले आहेत, तोच खरा मार्ग आहे.

The Vedas are diverse and the Smritis (scriptures) differ; there is no single sage whose word is accepted as the sole authority. The essence of Dharma is hidden in a deep cave (is very subtle). Therefore, the path followed by great personalities is the true path.


कुग्रामवासः कुजनस्य सेवा
कुभोजनं क्रोधमुखी च भार्या।
मूर्खश्च पुत्रो विधवा च कन्या
विनाग्निना सन्दहते शरीरम्।। ३३४।।

वाईट गावात राहणे (जिथे दुर्जन अधिक आहेत), दुष्ट माणसाची सेवा करणे, निकृष्ट प्रतीचे अन्न खाणे, नेहमी रागावणारी (कजाग) पत्नी असणे, मूर्ख मुलगा असणे आणि विधवा कन्या असणे—या सहा गोष्टी माणसाच्या शरीराला अग्नीशिवाय जाळून खातात.

Living in a bad village (surrounded by wicked people), serving a wicked person, eating poor-quality food, a wife who is always angry, a foolish son, and a widowed daughter—these six things burn the body even without fire.

माता निन्दति पिता नाभिनन्दति भ्राता न सम्भाषते
भृत्यः कुप्यति नानुगच्छति सुतः कान्ताऽपि नो रज्यते।
अर्थप्रार्थनशङ्कया न कुरुते सम्भाषणं वै सुहृत्
तस्माद्द्रव्यमुपार्जय सुमते द्रव्येण सर्वे वशाः।।३३५।।

(पैसे नसतील तर) आई निंदा करते, वडील कौतुक करत नाहीत, भाऊ बोलत नाही, नोकर रागवतो, मुलगा मागे येत नाही आणि पत्नीलाही ओढ राहत नाही. मित्रसुद्धा पैसे मागेल या भीतीने बोलणे टाळतात. म्हणून हे सुज्ञ माणसा, द्रव्य (संपत्ती) मिळव, कारण द्रव्याने सर्व काही वश होते.

The mother criticizes, the father does not praise, the brother does not speak, the servant gets angry, the son does not follow, and even the wife is not attached (when one lacks wealth). Friends avoid conversation fearing a request for money. Therefore, O wise one, earn wealth, for through wealth, everyone remains under one's influence.

वरं वनं व्याघ्रगजेन्द्रसेवितं
द्रुमालयं पक्वफलाम्बुभोजनम्।
तृणानि शय्या परिधानवल्कलं
न बन्धुमध्ये धनहीनजीवनम्।।३३६।।

वाघ आणि हत्तींचे वास्तव्य असलेल्या वनात राहणे श्रेष्ठ; झाडांच्या ढोलीत निवास करणे, पिकलेली फळे खाणे आणि पाणी पिऊन जगणे श्रेष्ठ; गवताच्या बिछान्यावर झोपणे आणि झाडाची साल परिधान करणेही श्रेष्ठ; पण आपल्याच नातेवाईकांमध्ये धनहीन (गरीब) होऊन जगणे कधीही चांगले नाही.

It is better to live in a forest inhabited by tigers and elephants, to dwell in the hollows of trees, to survive on ripe fruits and water, to sleep on a bed of grass, and to wear the bark of trees, than to live a life destitute of wealth among one's own kinsmen.

मनसि वचसि काये पुण्यपीयूषपूर्णाः
त्रिभुवनमुपकारश्रेणीभिः प्रीणयन्तः।
परगुणपरमाणून्पर्वतीकृत्य नित्यं
निजहृदि विकसन्तः सन्ति सन्तः कियन्तः।।३३७।।

ज्यांचे मन, वाणी आणि शरीर पुण्यरुपी अमृताने भरलेले आहे, जे आपल्या उपकारांनी तिन्ही लोकांना संतुष्ट करतात आणि जे इतरांचे अणूसमान (अगदी लहान) गुणही पर्वतासारखे मोठे करून पाहतात आणि आपल्या हृदयात सदैव आनंदी राहतात—असे सज्जन लोक या जगात कितीसे (खूपच थोडे) आहेत?

How many noble souls are there whose minds, words, and bodies are filled with the nectar of virtue; who please the three worlds with their series of good deeds; and who, magnifying even the atom-like virtues of others to the size of a mountain, always remain joyful in their own hearts?

सर्वथा स्वहितमाचरणीयं 
किं करिष्यति जनो बहुजल्पः।
विद्यते न खलु कश्चिदुपायः 
सर्वलोकपरितोषकरो यः।।३३८।।

नेहमी स्वतःच्या हिताचे (योग्य) आचरण करावे; खूप बडबड करणारे लोक काय म्हणतील याची काळजी करू नये. कारण या जगात असा कोणताही उपाय नाही ज्याद्वारे सर्वच्या सर्व लोकांना एकाच वेळी संतुष्ट करता येईल.

One should always act in a way that is beneficial to oneself (rightfully); what will people who talk too much do? Indeed, there is no way in existence by which one can satisfy all people at once.

सुखं हि दुःखान्यनुभूय शोभते
घनान्धकारेष्विव दीपदर्शनम्।
सुखात्तु यो याति नरो दरिद्रतां
धृतः शरीरेण मृतः स जीवति।।३३९।।

दुःख अनुभवल्यानंतरच सुखाची खरी किंमत कळते, ज्याप्रमाणे घोर अंधारात दिव्याचे दर्शन शोभा देते (मोलाचे ठरते). परंतु, जो मनुष्य सुखाच्या शिखरावरून थेट दारिद्र्यात (दुःखात) पडतो, तो जिवंत असूनही केवळ शरीर धारण केलेला मृत असल्यासारखाच जगतो.

Happiness truly shines only after one has experienced sorrows, just as the sight of a lamp is most beautiful in pitch-black darkness. However, a person who falls from a life of luxury into poverty lives like the "walking dead"—he is alive in body, but his spirit is deceased.

सहसा विदधीत न क्रियाम्
अविवेकः परमापदां पदम्।
वृणुते हि विमृश्यकारिणं 
गुणलुब्धाः स्वयमेव सम्पदः।।३४०।।

कोणतेही काम घाईघाईने किंवा विचार न करता करू नये; कारण अविचार (विवेकशून्यपणा) हा मोठ्या संकटांचे स्थान आहे. याउलट, जो विचारपूर्वक कार्य करतो, त्याला गुणलोभी संपत्ती (लक्ष्मी) स्वतःहून माळ घालते (स्वतःहून त्याच्याकडे येते).

One should not perform an action in haste without reflection; lack of discernment is the greatest source of disasters. Fortune (Prosperity), being a lover of virtues, chooses of its own accord those who act with careful deliberation.
स्वयं महेशः श्वशुरो नगेशः
सखा धनेशस्तनयो गणेशः।
तथापि भिक्षाटनमेव शम्भोः
बलीयसी केवलमीश्वरेच्छा।।३४१।।

स्वतः महादेव ईश्वराचे महान रूप आहेत, त्यांचा सासरा हिमालय हा पर्वतांचा राजा (नगेश) आहे, त्यांचा मित्र कुबेर (धनेश - धनपती) आहे, आणि पुत्र साक्षात गणपती (बुद्धी आणि समृद्धीचा देव) आहे. तरीही, शिवांना भिक्षा मागण्याची वेळ येते. म्हणूनच, ईश्वराची इच्छाच सर्वात बलवान असते.

Shiva himself is the Supreme Lord, his father-in-law is the King of Mountains (Himalaya), his friend is Kubera (the Lord of Wealth), and his son is Ganesha (the Lord of Prosperity). Yet, Shiva still has to wander for alms. Truly, the will of the Divine is the most powerful.

अद्यापि नोञ्झति हरः किल कालकूटं
कूर्मो बिभर्ति धरणीं खलु पृष्ठभागे।
अम्भोनिधिर्वहति दुस्तरवडवाग्निम्
अङ्गीकृतं सुकृतिनः परिपालयन्ति।।३४२।।

भगवान शिव आजही कंठात 'कालकूट' विष धरून बसले आहेत (त्यांनी ते सोडले नाही); कासव (कूर्म अवतार धारण केलेला विष्णू) आजही आपल्या पाठीवर पृथ्वीचा भार वाहतो आहे; आणि समुद्र आजही पोटात भयंकर 'वडवानल' (अग्निरूपी ज्वाला) धारण करून बसला आहे. कारण, सज्जन पुरुष ज्या गोष्टीचा अंगीकार करतात, ती प्राणपणाने पाळतातच.

Even today, Lord Shiva has not discarded the deadly 'Kalkuta' poison (from his throat); the Tortoise (Kurma) still carries the earth on its back; and the Ocean still bears the unquenchable submarine fire (Vadavanala) within. Truly, noble souls always fulfill the promises they have undertaken.

सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता
परो ददातीति कुबुद्धिरेषा।
अहं करोमीति वृथाभिमानः
स्वकर्मसूत्रग्रथितो हि लोकः।।३४३।।

सुखाचे किंवा दुःखाचे दान करणारे इतर कोणीही   नाही. 'दुसऱ्याने मला सुख दिले किंवा दुःख दिले' असे मानणे ही केवळ आपली कुबुद्धी आहे. तसेच 'मी करतो' (मी कर्ता आहे) असे म्हणणे हाही निव्वळ फोल अहंकार आहे. कारण, हे संपूर्ण जग आपापल्या कर्माच्या धाग्यांनी विणलेले आहे.

No one is the giver of happiness or misery. The idea that "another gives it to me" is merely a foolish misunderstanding. The egoistic belief that "I am the doer" is also a vain delusion. The entire world is, in fact, woven together by the threads of one's own past actions (Karma).

भिक्षुः क्वास्ति बलेर्मखे पशुपतिः किन्नास्त्यसौ गोकुले
मुग्धे पन्नगभूषणः सखि सदा शेते च तस्योपरि।
आर्ये मुञ्च विषादमाशु कमले नाहं प्रकृत्या चला
चेत्थं गिरिजासमुद्रसुतयोः सम्भाषणं पातु वः।।३४४।।

लक्ष्मी  -- भिक्षू कुठे आहे? 
पार्वती -- बळीच्या यज्ञामध्ये असेल. 
लक्ष्मी  -- मी पशुपतीबद्दल बोलत आहे.
पार्वती -- म्हणजे तो गोकुळात नाही काय?
लक्ष्मी  -- अगं वेडे मी सर्प ज्याचा अलंकार आहे त्याच्याविषयी म्हणते आहे.
पार्वती -- सखे तो तर त्या सर्पावरतीच नेहमी झोपलेला असतो. 
लक्ष्मी -- आर्ये तू खिन्नता (विषाद) ताबडतोब सोडून दे. 
             (गर्भितार्थ-- विष खाणाऱ्याला सोडून दे)
पार्वती -- लक्ष्मी,मी काही (तुझ्यासारखी) स्वभावाने चंचल नाही.
अशाप्रकारे हिमालयाची कन्या पार्वती आणि समुद्राची कन्या लक्ष्मी यांचा चाललेला संवाद तुमचे रक्षण करो.

(हा श्लोक 'वाकोवाक्यम्' या प्रकारचा आहे. लक्ष्मी शंकराला म्हणजे पार्वतीच्या पतीला उद्देशून 'भिक्षू' 'पशुपती' 'पन्नगभूषण' यासारखी विशेषणे वापरते. त्यांचा एक अर्थ अध्यात्मिक असला तरी दुसरा यौगिक अर्थ व्यक्तीचे समाजातील कनिष्ठ स्थान दर्शविणारा आहे. लक्ष्मी पार्वतीचा पती दरिद्री आणि कमी दर्जाचा आहे असे दाखवून पार्वतीचा उपहास करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु लक्ष्मीने शंकराच्या बाबतीमध्ये वापरलेली सर्व विशेषणे पार्वती चतुराईने, लक्ष्मीचा पती विष्णू यालाही लागू होतात असे दाखवते. शेवटी लक्ष्मी 'शंकर हा विष खाणारा असल्यामुळे त्याला तू सोडून दे' असे आडून पार्वतीला सुचवते; तेव्हा 'तू स्वभावाने चंचल असल्यामुळे कदाचित आपल्या पतीला सोडू शकतेस परंतु मी तशी नाही' असे पार्वती लक्ष्मीला सुनावते.)

Lakhmi asks, "Where is the beggar (Shiva)?" Parvati replies, "He is at Bali's sacrifice." Lakshmi says, "I am talking about Pashupati (the cattle herder)" Parvati retorts, "Is he not in Gokula (the cow-herders' settlements)?" Lakshmi says "O foolish one, I mean, the one who has snake as his ornament (Shiva)" Parvati replies, "Friend, he is always resting on  the serpent-bed  (on Shesha-naga)!" Lakshmi then adds, "O noble one, cast aside your sorrow (alternatively leave the one who drinks poisons). Parvati retorts, "Lakshmi  I am not fickle (unstable) by nature (like you)" May this dialogue between the daughter of the mountain (Parvati) and the daughter of the ocean (Lakshmi) protect you.

(Such exchange of dialogue is called वाकोवाक्यम्. Laxmi derides Parvati by alluding to her husband Shiva's epithets such as भिक्षु:,पशुपति:, पन्नगभूषण: which have naunced alternative meanings that point to a person of socially inferior status. Upon this, Parvati deftly shows that these epithets can also be used in case of Lakshmi's husband Vishnu. In the end, apparently to console Parvati Lakshmi says, "Let go of your sadness (विषाद) which you might be feeling because of your husband's socially inferior status. But the sentense has the alterante meaning -- 'Leave the one who drinks poisons'. Upon this Parvati points out that she will not leave her husband because she is not fickle natured like Lakshmi.)

अम्बा कुप्यति तात मूर्ध्नि विधृता गङ्गेयमुत्सृज्यतां
विद्वन् षण्मुख सन्ततं मयि रता तस्या गतिः का वद।
कोपाटोपवशाद्विवृद्धवदनः प्रत्युत्तरं दत्तवान्
अम्भोधिर्जलधिः पयोधिरुदधिर्वारांनिधिर्वारिधिः।।३४५।।

कार्तिकेय -- बाबा, आई रागवली आहे. डोक्यावर धारण केलेल्या गंगेला ताडतोब सोडून द्या
शिव       -- अरे दीडशहण्या षण्मुखा, ती तर माझ्यातच नेहमी रमलेली असते तेव्हा 
                तिला दुसरी कोणती गती असेल? (ती दुसरीकडे कुठे जाईल?)
तेव्हा रागाने ज्याने आपली तोंडे फुगवलेली आहेत अशा कार्तिकेयाने (आपल्या सहाही तोंडानी) प्रत्युत्तर दिले-- समुद्र, समुद्र, समुद्र, समुद्र, समुद्र, समुद्र

(हा देखील श्लोक 'वाकोवाक्यम्' या प्रकारचा आहे. शंकरांनी आपल्या सवतीला म्हणजे गंगेला डोक्यावर स्थान दिलेले पाहून पार्वतीला फार राग येतो. तेव्हा तिची बाजू घेऊन कार्तिकेय गंगेला सोडून देण्याचा सल्ला शंकरांना देतो. परंतु शंकर म्हणतात गंगेला माझ्याशिवाय दुसरी गती नाही. तेव्हा शंकरांनी दिलेले उत्तर ऐकून; विशेषत: 'दीडशहाण्या' हे आपल्याला वापरलेले संबोधन ऐकून त्यालाही फार राग येतो आणि तो आपल्या सहा तोंडांनी समुद्राची वेगवेगळी नावे उच्चारून 'समुद्र हीच गंगेची अंतिम गती आहे; तेव्हा तिने समुद्राकडेच जावे' असे सुचवतो.)

Karthikeya says to Shiva, "Father , mother is angry. So leave the Ganga whom you have given a place on your head." Shiva replies, "Oh all-wise Shanmukha, the Ganga always being absorbed in me--tell me where else she could possibly go?" Then Kartikeya whose faces are puffed with anger replies which his six mouths uttering six different names of the ocean. 

(This is also an instance of वाकोवाक्यम्. Parvati, Shiva's wife, is angry with Shiva as he has given the most prominent place of his body--his head-- to the Ganga, her co-wife. So Shiva's son Kartikeya sides with her. But hearing Shiva's reply calling him 'all-wise', he also gets angry with his father and suggest that the final destination for the Ganga
is the ocean only. To emphasize this he utters six names of the ocean with his six mouths.)

अहो महत्त्वं महतामपूर्वं
विपत्तिकालेऽपि परोपकारः।
यथास्यमध्ये पतितोपि राहोः
कलानिधिः पुण्यचयं ददाति।।३४६।।

अहो, खरोखरच महान व्यक्तींचा मोठेपणा किती विलक्षण आणि अद्वितीय असतो! कारण, संकटाच्या काळातही ते दुसऱ्याचे भले करणे सोडत नाहीत. ज्याप्रमाणे चंद्र राहूच्या मुखात (ग्रहणाच्या संकटात) सापडलेला असूनही, त्या वेळीही तो जगाला पुण्यफळ देतो (ग्रहण काळात अध्यात्मिक साधना केल्यास मोठे पुण्य मिळते अशी ज्योतिषशास्त्राची मान्यता आहे)

Oh, how unique and unparalleled is the greatness of the noble souls! Even during times of adversity, they never cease to help others. Just as the Moon, even while caught in the mouth of Rahu (during an eclipse), continues to bestow merit (or blessings) upon the world. (According to Indian astrology this spiritual practices done during the time of an eclipse bestows great merit)

मित्रं प्रीतिरसायनं नयनयो: आनन्दकरं चेतसः 
पात्रं यत्सुखदुःखयोः सह भवेन्मित्रेण तद्दुर्लभम्।
ये चान्ये सुहृदः समृद्धिसमये द्रव्याभिलाषाकुला:
ते सर्वत्र मिलन्ति तत्त्वनिकषग्रावा तु तेषां विपत्।।३४७।।

जो जणू प्रेमाचे जीवनदायी रसायनच आहे, डोळ्यांना प्रिय आहे , मनाला आनंद देणारा आहे, जो आपल्या सुख-दुःखात भागीदार असतो, असा 'सच्चा मित्र' मिळणे खूप दुर्मिळ आहे. मात्र, भरभराटीच्या काळात जे पैशांच्या लोभापायी जवळ येतात, असे 'मित्र' तर सगळीकडेच सहज मिळतात. त्यांच्या खरेपणाची खरी परीक्षा 'विपत्ती' (संकटाचा काळ) हीच असते.

A true friend is the elixir of love, a soothing balm to the eyes, a source of joy to the mind, and a companion in both happiness and sorrow—such a friend is rare to find. However, those 'friends' who are driven by greed for wealth during times of prosperity are found everywhere; the true touchstone (test) of their sincerity is adversity.

धर्मः सर्वसुखाकरो हितकरो धर्मं बुधाश्चिन्वते
धर्मेणैव समाप्यते शिवसुखं धर्माय तस्मै नमः।
धर्मान्नास्त्यपर: सुहृद्भवभृतां धर्मस्य मूलं दया
धर्मे चित्तमहं दधे प्रतिदिनं हे धर्म मां पालय।।३४८।।

धर्म हा सर्व सुखांचा उगम आहे आणि तो सर्वांचे हित साधणारा आहे. ज्ञानी लोक धर्माचाच संचय करतात. धर्म हेच मोक्षसुखाचे साधन आहे, म्हणून त्या धर्माला मी नमस्कार करतो. प्राणिमात्रांसाठी धर्मापेक्षा दुसरा मोठा मित्र कोणीही नाही आणि त्या धर्माचे मूळ 'दया' आहे. अशा त्या धर्माचे मी प्रतिदिन चिंतन करतो. हे धर्मा, तू माझे रक्षण कर!

Dharma (Righteousness) is the source of all happiness and is beneficial; wise people accumulate Dharma. It is through Dharma alone that one attains supreme bliss (liberation). I bow to that Dharma. There is no greater friend to living beings than Dharma, and the root of Dharma is 'Daya' (Compassion). I meditate upon this Dharma every day; O Dharma, protect me!

मातेव रक्षति पितेव हिते नियुङ्क्ते
कान्तेव चापि रमयत्यपनीय खेदम्।
लक्ष्मीं तनोति वितनोति च दिक्षु कीर्तिं
किं किं न साधयति कल्पलतेव विद्या।।३४९।।

विद्या मातेप्रमाणे रक्षण करते, पित्याप्रमाणे हिताच्या कामात प्रवृत्त करते आणि पत्नीप्रमाणे मनातील दुःख दूर करून आनंद देते. ती लक्ष्मी (संपत्ती) वाढवते आणि दशदिशांना कीर्ती पसरवते. सांगा, 'कल्पलते'सारखी असलेली ही विद्या मानवासाठी काय काय साध्य करत नाही? (अर्थात, ती सर्व काही साध्य करते).

Knowledge (Vidya) protects like a mother, engages one in beneficial tasks like a father, and delights the mind by removing sorrow like a wife. It increases wealth and spreads fame in all directions. What is it that this Knowledge—like a Kalpalata (wish-fulfilling creeper)—does not achieve for a person?

गुणवदगुणवद्वा कुर्वता कार्यमादौ
परिणतिरवधार्या यत्नतः पण्डितेन।
अतिरभसकृतानां कर्मणामाविपत्ते:
भवति हृदयदाही शल्यतुल्यो विपाकः।।३५०।।

कोणतेही कार्य मग ते चांगले असो वा वाईट, ते सुरू करण्यापूर्वी शहाण्या माणसाने त्याच्या परिणामाचा  जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे. कारण, अत्यंत घाईघाईने किंवा विचार न करता केलेल्या कर्मांचा परिणाम हा मरेपर्यंत हृदयाला जाळणाऱ्या एखाद्या शल्याप्रमाणे (रुतलेल्या काट्याप्रमाणे) बोचत राहतो.

Whether a task is good or bad, a wise person must first carefully deliberate upon its eventual consequence. The result of actions performed with extreme haste (without reflection) remains a heart-burning agony, like a persistent thorn, until the very end of one's life.
लोभश्चेदगुणेन किं पिशुनता यद्यस्ति किं पातकैः
सत्यं चेत्तपसा च किं शुचि मनो यद्यस्ति तीर्थेन किम्।
सौजन्यं यदि किं गुणैः सुमहिमा यद्यस्ति किं मण्डनैः
सद्विद्या यदि किं धनैरपयशो यद्यस्ति किं मृत्युना।। ३५१।।

जर अंगी लोभ असेल तर इतर दुर्गुणांची काय गरज? (लोभ हाच सर्वात मोठा दुर्गुण आहे). जर चहाडी करण्याची वृत्ती असेल, तर इतर पापांची काय गरज? जर सत्य असेल, तर तपश्चर्येची काय गरज? जर मन शुद्ध असेल, तर तीर्थयात्रेची काय गरज? जर सौजन्य (सात्विकता) असेल, तर इतर गुणांची काय गरज? जर चांगली कीर्ती असेल, तर दागिन्यांची काय गरज? जर उत्तम विद्या असेल, तर धनाची काय गरज? आणि जर अपयश (अपकीर्ती) वाट्याला आली असेल, तर मृत्यूची काय गरज? (कारण अपकीर्ती ही मृत्यूहूनही भयानक आहे).

If there is greed, what is the need for other vices? If there is backbiting, what is the need for other sins? If there is truth, why perform penance? If the mind is pure, what is the use of a pilgrimage? If there is gentleness, what use are other virtues? If there is great fame, why wear ornaments? If there is true knowledge, why seek wealth? And if there is infamy, what need is there for death? (For infamy is worse than death).

त्यजन्ति मित्राणि धनैर्विहीनं 
पुत्राश्च दाराश्च सुहृज्जनाश्च । 
तमर्थवन्तं पुनराश्रयन्ति 
ह्यर्थो हि लोके पुरुषस्य बन्धुः।। ३५२।।

माणसाचे धन संपले की मित्र, पुत्र, पत्नी आणि जवळचे नातेवाईक त्याला सोडून जातात. पण तोच माणूस पुन्हा धनवान झाला की ते सर्व पुन्हा त्याच्याकडे येतात. म्हणून, या जगात 'पैसा' हाच माणसाचा खरा नातेवाईक (बंधू) मानला जातो.

Friends, sons, wives, and relatives abandon a person who is devoid of wealth. But when that same person becomes wealthy again, they return to him. Indeed, in this world, wealth alone is a man’s true kinsman.

बुभुक्षितैर्व्याकरणं न भुज्यते
पिपासितैः काव्यरसो न पीयते।
न छन्दसा केनचिदुद्धृतं कुलम् 
हिरण्यमेवार्जय निष्फला गुणा: ।।३५३।।

भूक लागली असताना व्याकरण खाल्ले जात नाही (भूक व्याकरणाने भागत नाही), तहान लागली असताना काव्याचा रस पिता येत नाही. केवळ छंदशास्त्रामुळे कुळाचा उद्धार होत नाही. म्हणून, द्रव्य (धन) मिळवण्याचा प्रयत्न करा; धनाशिवाय इतर सर्व गुण निष्फळ ठरतात.

Grammar cannot be eaten by the hungry; the "juice" of poetry cannot be drunk by the thirsty. No one’s lineage is saved by mere knowledge of prosody (meter). Therefore, earn gold (wealth); without it, all other talents are fruitless.

वैद्याः वदन्ति कफपित्तमरुद्विकारान्
ज्योतिर्विदो ग्रहगतिं परिवर्तयन्ति ।
भूताभिषङ्ग इति भूतविदो वदन्ति
प्रारब्धकर्म बलवन्मुनयो वदन्ति।।३५४।।

एखादे संकट आले की वैद्य म्हणतात 'हा कफ, पित्त किंवा वायूचा दोष आहे'. ज्योतिषी म्हणतात 'ग्रहांची चाल बदलली आहे'. भूतविद्या जाणणारे म्हणतात 'ही भुताची बाधा आहे'. परंतु, मुनी (ज्ञानी लोक) मात्र असे सांगतात की, हे सर्व आपल्या 'प्रारब्ध कर्माचा' (नशिबाचा) खेळ आहे आणि तेच सर्वात बलवान आहे.

When illness or trouble strikes, physicians blame the imbalance of phlegm, bile, or wind. Astrologers claim it is the shifting movement of the planets. Exorcists say it is the influence of spirits. But the wise sages declare that it is simply the power of one’s 'Prarabdha' (past destiny) at work.

संतप्तायसि संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते, 
तदेव मुक्ताकारतया नलिनी पत्रस्थितो राजते। 
स्वात्यां सागरशुक्तिसम्पुटगतौ तन्मौक्तिकं जायते, 
प्रायेणाधममध्यमोत्तमगुण: संसर्गतो जायते ।। ३५५।।

तप्त लोखंडावर पाण्याचा थेंब पडला तर त्याचे नावही उरत नाही (तो लगेच जळून जातो). तोच पाण्याचा थेंब कमळाच्या पानावर पडला तर तो मोत्यासारखा चमकू लागतो. आणि तोच थेंब जर स्वाती नक्षत्रात समुद्रातील शिंपल्यात पडला, तर त्याचा खरोखरच मोती बनतो. अशा प्रकारे, माणसाचे अधम (नीच), मध्यम किंवा उत्तम गुण हे त्याच्या संगतीवरच अवलंबून असतात.

A drop of water falling on hot iron vanishes instantly, leaving no trace. The same drop, when resting on a lotus leaf, shines like a pearl. And if it falls into an oyster shell in the ocean during the Swati constellation, it actually becomes a pearl. Generally, the low, middle, or high qualities of a person are determined by the company they keep.

क्षते प्रहारा निपन्तत्यभीक्ष्णम्
धनक्षये वर्धते जाठराग्नि:।
आपत्सु मित्राणि परित्यजन्ति
छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ति ।।३५६।।

जिथे जखम झाली असते, तिथेच वारंवार प्रहार होतात. जेव्हा माणसाचे धन नष्ट होते, तेव्हाच त्याची भूक (जाठराग्नि) अधिक प्रबळ होते. संकटाच्या काळात मित्रही सोडून जातात. म्हणूनच म्हटले आहे की, जिथे दोष किंवा छिद्र (कमकुवतपणा) असते, तिथेच अनर्थांची मालिका वाढते.
English:
Blows often fall repeatedly on an already existing wound. When wealth is lost, the fire of hunger (appetite) increases. In times of trouble, friends often abandon you. Indeed, misfortunes multiply where there are already gaps or weaknesses.

रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातं
भास्वानुदेष्यति हसिष्यति पङ्कजश्रीः।
इत्थं विचिन्तयति कोषगते द्विरेफे
हा हन्त हन्त गजो नलिनीमुज्जहार।।३५७।।

रात्र संपेल, सुंदर सकाळ होईल, सूर्य उगवेल आणि कमळाची शोभा पुन्हा फुलेल (कमळ उमलेल),"—कमळाच्या पाकळ्यांत अडकलेला भुंगा असा विचार करतच होता, तोच—'अरेरे, काय हे दुर्दैव!—एका हत्तीने ते कमळच मुळासकट उपटून टाकले! (चांगले घडणार या अपेक्षेने मनुष्य आशावादी होऊन बसला असताना दैवाचा आघात त्याची आशाच नष्ट करतो )

"The night will pass, a beautiful dawn will arrive, the sun will rise, and the lotus will bloom again in all its glory,"—while the bee, trapped inside the closed petals, was thinking thus, alas! A rogue elephant uprooted the entire lotus plant! ( The person who has hpoe for a better future -- his hpoe is destroyed suddenly by a sudden stroke of fate)

अव्याकरणमधीतं 
भिन्नद्रोण्या तरङ्गिणीतरणम्।
भेषजमपथ्यसहितं 
त्रयमिदमकृतं वरं न कृतम्।।३५८।।

व्याकरणाशिवाय केलेले अध्ययन, फुटलेल्या नौकेने (होडीने) नदी ओलांडणे आणि पथ्य न पाळता घेतलेले औषध—या तीन गोष्टी न केलेल्याच बऱ्या; कारण त्या फायद्याऐवजी नुकसानच जास्त करतात.

Study without the knowledge of grammar, crossing a river in a broken boat, and taking medicine without following a proper diet—these three are better left undone than done.

शस्त्रैर्हतास्तु रिपवो न हता भवन्ति
प्रज्ञाहताश्च नितरां सुहता भवन्ति।
शस्त्रं निहन्ति पुरुषस्य शरीरमेकं
प्रज्ञा कुलं च विभवं च यशश्च हन्ति।।३५९।।

शस्त्राने मारलेले शत्रू खरोखर मेलेले नसतात (कारण त्यांचा विचार किंवा वंश उरतो), पण बुद्धीने पराभूत केलेले शत्रू पूर्णपणे नष्ट होतात. शस्त्र केवळ माणसाच्या शरीराचा नाश करते, परंतु बुद्धी (चातुर्य) त्याचे कूळ, वैभव आणि यश या सर्वांचा नाश करू शकते.

Enemies killed by weapons are not truly destroyed, but those defeated by intellect are completely vanquished. A weapon kills only the physical body of a person, but intellect can destroy one's entire lineage, wealth, and fame.

कुपात्रदानाच्च भवेद्दरिद्रो
दारिद्र्यदोषेण करोति पापम्।
पापप्रभावान्नरकं प्रयाति
पुनर्दरिद्रः पुनरेव पापी।।३६०।।

कुपात्राला (अयोग्य व्यक्तीला) दान दिल्यामुळे माणूस दरिद्री होतो. दारिद्र्याच्या दुःखामुळे तो पापाचे आचरण करतो. पापकर्म केल्यामुळे तो नरकात जातो आणि पुन्हा दरिद्री म्हणून जन्म घेऊन पुन्हा पापी बनतो. (हे एक दुष्टचक्र आहे).

By giving charity to the unworthy, one becomes poor. Due to the sting of poverty, one commits sins. Because of the influence of sin, one goes to hell and is born poor again, becoming a sinner once more.
यस्तु सञ्चरते देशान् 
सेवते यस्तु पण्डितान्।
तस्य विस्तारिता बुद्धि: 
तैलबिन्दुरिवाम्भसि।।३६१।।

जो मनुष्य वेगवेगळ्या देशांत प्रवास करतो आणि विद्वान लोकांची सेवा (संगत) करतो, त्याची बुद्धी पाण्यावर पडलेल्या तेलाच्या थेंबाप्रमाणे विस्तारत जाते (चौफेर पसरते).

One who travels to different lands and serves (associates with) learned scholars finds his intellect expanding, much like a drop of oil spreads rapidly across the surface of water.

असितगिरिसमं स्यात्कज्जलं सिन्धुपात्रं
सुरतरुवरशाखा लेखनी पत्रमुर्वी।
लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं
तदपि तव गुणानामीश पारं न याति।।३६२।।

जर काजळाच्या डोंगराएवढी शाई असेल, समुद्र हे शाईचे पात्र असेल, कल्पवृक्षाची फांदी ही लेखणी असेल आणि संपूर्ण पृथ्वी हा कागद असेल; आणि जर स्वतः सरस्वती देवी अनंत काळ तुमचे गुण लिहीत बसली, तरीही हे ईश्वरा, तुमच्या गुणांचा अंत लागणार नाही.

If the mountain of soot were the material for the ink, the ocean the ink-pot, the branch of the celestial tree the pen, and the earth the writing leaf; even then, if Goddess Saraswati herself were to write for all eternity, she would not reach the end of Your virtues, O Lord.

अहस्तानि सहस्तानां 
अपदानि चतुष्पदाम् ।
फल्गूनि तत्र महतां 
जीवो जीवस्य जीवनम् ।।३६३।।

हात नसलेले प्राणी हे हात असलेल्यांचे (मानवांचे) भक्ष्य आहेत, पाय नसलेले (किंवा न हलणारे) हे चार पाय असलेल्यांचे भक्ष्य आहेत. दुबळे हे बलवानांचे अन्न आहेत. थोडक्यात, या जगात एक जीव हा दुसऱ्या जीवाचे जीवन (अन्न) आहे.

Those without hands are prey for those with hands; those without feet (or immobile) for the four-footed; the weak for the strong. Truly, in this world, one living being is the sustenance for another.

गन्धः सुवर्णे फलमिक्षुदण्डे
नाकारि पुष्पं खलु चन्दनेषु।
विद्वान्धनाढ्यो न तु दीर्घजीवी
धातुः पुरा कोऽपि न बुद्धिदोऽभूत्।।३६४।।

सोन्याला सुगंध, ऊसाला फळ आणि चंदनाच्या झाडाला फुले निसर्गाने दिली नाहीत. विद्वान माणूस श्रीमंत नसतो आणि तो दीर्घायुषीही नसतो. असे वाटते की पूर्वी ब्रह्मदेवाला कोणीही योग्य सल्ला देणारा (बुद्धी देणारा) नव्हता, अन्यथा त्याने या त्रुटी ठेवल्या नसत्या.

Nature did not give scent to gold, fruit to the sugarcane stalk, or flowers to the sandalwood tree. A learned man is rarely wealthy, and he is not long-lived. It seems that in the beginning, there was no one to advise the Creator (Brahma), or these perfections would not have been missing.

उदयति यदि भानुः पश्चिमे दिग्विभागे
प्रचलति यदि मेरुः शीततां याति वह्निः।
विकसति यदि पद्मं पर्वताग्रे शिलायां
न चलति खलु वाक्यं सज्जनानां कदाचित्।।३६५।।

कदाचित सूर्य पश्चिम दिशेला उगवेल, कदाचित महाकाय मेरू पर्वत ढळू लागेल, अग्नी कदाचित शीतल होईल, किंवा पर्वताच्या शिखरावर दगडांतून कमळ फुलेल—या सर्व अशक्य गोष्टी कदाचित शक्य होतील; परंतु सज्जन माणसाने दिलेला शब्द कधीही बदलत नाही.

Even if the sun were to rise in the western quarter, even if the mighty Mount Meru were to move, even if fire were to become cold, and even if a lotus were to bloom on the rocky peak of a mountain—these impossible things might happen, but the word of a noble person never wavers.

याऽक्षय्यं बीजमेकं जगदखिलगिरां सर्वसाफल्यमूलं 
या रम्यस्निग्धवर्णा मृदुमधुरपदाऽलङ्कृतिश्लिष्यमाणा ।
या छन्दस्सूत्रबद्धा विविधरसगुणा भूरिभावाऽन्विता या 
सा भाषा संस्कृताऽख्या प्रतिजनि कुरुतां सेवकं मां स्वकीयम् ।।३६६।।

जी जगातील सर्व भाषांचे अक्षय असे बीज आहे आणि सर्व यशाचे मूळ आहे; जिचे वर्ण (अक्षरे) सुंदर आणि स्निग्ध आहेत; जिची पदे कोमल, मधुर आणि अलंकारांनी नटलेली आहेत; जी छंदांच्या सूत्रात बद्ध असून विविध रस, गुण आणि अनेक भावांनी युक्त आहे—ती 'संस्कृत' नावाची भाषा मला प्रत्येक जन्मात आपला सेवक बनवून ठेवो.

May that language called Sanskrit—which is the inexhaustible seed of all the world's tongues and the root of all success; whose letters are beautiful and pleasing; whose words are soft, sweet, and adorned with ornaments; which is bound by the rules of prosody and enriched with various moods and emotions—make me its servant in every birth.

अरक्षितं तिष्ठति दैवरक्षितं 
सुरक्षितं दैवहतं विनश्यति ।
जीवत्यनाथोऽपि वने विसर्जितः 
कृतप्रयत्नोऽपि गृहे न जीवति ।। ३६७।।

ज्याचे रक्षण दैव (नशीब) करत आहे, तो रक्षक नसतानाही सुरक्षित राहतो; परंतु ज्याला दैवाने मारले आहे, तो सर्व बाजूंनी सुरक्षित असूनही नष्ट होतो. वनात सोडून दिलेला अनाथ बालकही (दैवामुळे) जिवंत राहतो, तर घरी सर्व प्रयत्न करूनही एखादा माणूस मृत्यूपासून वाचू शकत नाही.

That which is protected by Fate remains safe even if unguarded, while that which is struck by Fate perishes despite being well-protected. An orphan abandoned in a forest may survive, while one in a home may not survive despite every effort made to save him.


शशिदिवाकरयोर्ग्रहपीडनं 
गजभुजङ्गमयोरपि बन्धनम् ।
मतिमतां च विलोक्य दरिद्रतां 
विधिरहो बलवानिति मे मतिः ।। ३६८।।

चंद्र आणि सूर्याचे ( ग्रहणकाळी राहू)  ग्रहाद्वारे होणारे पीडन, हत्ती आणि सर्प यांनादेखील होणारे बंधन (कैद), आणि विद्वान लोकांचे दारिद्र्य पाहून माझे असे मत बनले आहे की—अहो! विधी (नशीब/प्रारब्ध) खरोखरच बलवान आहे.

Seeing the eclipses of the sun and the moon, the captivity of elephants and serpents, and the poverty of the wise—it is my firm opinion that destiny is indeed all-powerful.

दिवसेनैव तत् कुर्याद् 
येन रात्रौ सुखं वसेत्।
यावज्जीवं च तत्कुर्याद् 
येन प्रेत्य सुखं वसेत् ।। ३६९।।

दिवसभर असे काम करावे (इतकी मेहनत करावी) जेणेकरून रात्री सुखाची झोप लागेल; आणि आयुष्यभर अशी सत्कर्मे करावीत जेणेकरून मृत्यूत्तर (परलोकात) सुख प्राप्त होईल.

One should do during the day that which allows one to live (sleep) in peace at night; and one should do throughout life that which allows one to dwell in happiness after death.

अकृतेऽप्युद्यमे पुंसाम् 
अन्यजन्मकृतं फलम् ।
शुभाऽशुभं समभ्येति 
विधिना संनियोजितम् ।। ३७०।।

माणसाने या जन्मात प्रयत्न केले नाहीत तरी, गेल्या जन्मी केलेल्या कर्मांचे शुभ किंवा अशुभ फळ विधीने (दैवाने) योजल्यानुसार त्याच्याकडे चालत येतेच.

Even if a person makes no effort in this life, the fruits of actions performed in previous births—whether auspicious or inauspicious—will surely reach him as ordained by destiny.
प्रसह्य मणिमुद्धरेन्मकरवक्त्रदंष्ट्राङ्कुरात्
समुद्रमपि संतरेत्प्रचलदूर्मिमालाकुलम्।
भुजङ्गमपि कोपितं शिरसि पुष्पवद्धारयेत्
न तु प्रतिनिविष्ट मूर्खजनचित्तमाराधयेत्।।३७१।।

मगरीच्या जबड्यातून जबरदस्तीने मणी काढता येईल, खवळलेल्या लाटांचा समुद्र पोहून पार करता येईल, रागावलेल्या सापाला फुलासारखे डोक्यावर धारण करता येईल; पण हेकट (हट्टी) मूर्ख माणसाचे मन कधीही वळवता येणार नाही.

One might forcibly extract a gem from a crocodile's jaws, or cross an ocean tossed with waves, or wear a furious serpent on the head like a flower; but one can never satisfy the mind of an obstinate fool.

मर्माण्यस्थीनि हृदयं तथासून् 
रूक्षा वाचो निर्दहन्तीह पुंसाम् ।
तस्माद् वाचमुषतीमुग्ररूपां 
धर्मारामो नित्यशो वर्जयीत ॥३७२।।

कठोर शब्द माणसाची मर्मस्थाने, हाडे, हृदय आणि प्राणांना देखील जाळून टाकतात. म्हणून, धर्माचे पालन करणाऱ्या माणसाने अशा अत्यंत कठोर आणि उग्र वाणीचा नेहमी त्याग करावा.

Harsh words burn the vital spots, the bones, the heart, and the very life-breath of a person. Therefore, one who delights in righteousness should always avoid speaking cruel and fierce words.

शास्त्राण्यधीत्यापि भवन्ति मूर्खा
यस्तु क्रियावान् पुरुष: स विद्वान्।
सुचिन्तितं चौषधमातुराणां
न नाममात्रेण करोत्यरोगम्।।३७३।।

शास्त्रांचा अभ्यास करूनही अनेक लोक मूर्खच राहतात; खरा विद्वान तोच जो त्या ज्ञानानुसार कृती करतो. ज्याप्रमाणे एखाद्या औषधाचे चिंतन केल्याने रुग्ण बरा होत नाही (तर ते औषध घ्यावे लागते), तसेच केवळ ज्ञानाने नव्हे, तर आचरणानेच माणूस थोर होतो.

Even after studying the scriptures, people can remain fools; only he who puts knowledge into practice is truly wise. Just as a well-thought-out medicine cannot cure a patient by its name alone (it must be consumed), mere knowledge without action is fruitless.

कल्पद्रुम: कल्पितमेव सूते
सा कामधुक् कामितमेव दोग्धि।
चिन्तामणिश्चिन्तितमेव दत्ते
सतां तु सङ्ग: सकलं प्रसूते।।३७४।।

कल्पवृक्ष फक्त कल्पिलेले (विचार केलेले) देतो, कामधेनू फक्त इच्छिलेले अर्पण करते आणि चिंतामणी फक्त ज्याचा विचार केला आहे तेच देतो. परंतु, सज्जनांची संगत (सत्संग) मात्र कल्पनेपलीकडील सर्व काही प्रदान करते.

The Kalpavriksha (wish-fulfilling tree) gives only what is imagined; the Kamadhenu (divine cow) yields only what is desired; the Chintamani (divine gem) bestows only what is thought of. But the company of the righteous (Satsang) bestows everything one could ever need.

दधि मधुरं मधु मधुरं
द्राक्षा मधुरा सुधापि मधुरैव।
तस्य तदेव हि मधुरं
यस्य मनो यत्र संलग्नम्।।३७५।।

दही गोड आहे, मध गोड आहे, द्राक्षे गोड आहेत आणि अमृतही गोडच आहे. परंतु, ज्याचे मन ज्या गोष्टीत गुंतलेले असते, त्याला तीच गोष्ट जगात सर्वात गोड वाटते.

Curd is sweet, honey is sweet, grapes are sweet, and even nectar is sweet. However, for an individual, that thing alone is truly sweet in which his heart is deeply attached.

चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्नं
चित्ते विषण्णे भुवनं विषण्णम्।
अतोऽभिलाषो यदि ते सुखे स्यात्
चित्तप्रसादे प्रथमं यतस्व।।३७६।।

जर तुमचे मन प्रसन्न असेल, तर संपूर्ण जग तुम्हाला प्रसन्न वाटते; पण जर तुमचे मन दुःखी (विषण्ण) असेल, तर संपूर्ण जगही दुःखी वाटते. म्हणून, जर तुला सुखाची इच्छा असेल, तर सर्वात आधी तुझे मन प्रसन्न करण्याचा प्रयत्न कर.

If the mind is cheerful, the whole world appears cheerful; if the mind is dejected, the whole world feels gloomy. Therefore, if you desire happiness, strive first to achieve peace and clarity of mind.

दम्भेन लोभेन भिया ह्रिया वा
प्रायो विनीतो जन एष सर्व:।
वैराग्यतस्त्वाहृदयं विनीतं
नरं वरं दुर्लभमेव मन्ये।।३७७।।

बहुतेक लोक ढोंगापोटी, लोभापोटी, भीतीपोटी किंवा केवळ लाजेपोटी नम्रता दाखवतात. परंतु, ज्यांचे हृदय वैराग्यामुळे खरोखरच नम्र झाले आहे, असे श्रेष्ठ पुरुष या जगात अत्यंत दुर्मिळ आहेत.

Most people act humble out of hypocrisy, greed, fear, or shame. However, those whose hearts are truly humble due to a sense of detachment (Vairagya) are rare and superior beings.

प्रत्यर्थिभूतामपि तां समाधे:
शुश्रूषमाणां गिरिशोऽनुमेने।
विकारहेतौ सति विक्रियन्ते
येषां न चेतांसि त एव धीरा:।।३७८।।

भगवान शंकरांनी पार्वतीने केलेली सेवा स्वीकारली, जरी ती त्यांच्या समाधीत अडथळा ठरणार होती. खरे धैर्यवान तेच असतात, ज्यांचे मन विचलित होण्याची सर्व कारणे समोर असतानाही मुळीच विचलित होत नाही.

Lord Shiva allowed Parvati to serve Him, even though she was a potential distraction to His meditation. Truly courageous (steadfast) are those whose minds remain undisturbed even when the causes for distraction or emotion are present.

काचं मणिं काञ्चनमेकसूत्रे
मुग्धा निबध्नन्ति किमत्र चित्रम्।
विचारवान् पाणिनिरेकसूत्रे
श्वानं युवानं मघवानाह।।३७९।।

अज्ञानी लोक काच, मणी आणि सोने एकाच धाग्यात गुंफतात, (एकमेकांशी आपातत: काहीही संबंध नसलेल्या श्रेष्ठ आणि कनिष्ठ गोष्टींना एकत्र करतात) यात नवल काय? विचारवंत पाणिनीने देखील आपल्या एकाच सूत्रात कुत्रा (श्वान), युवक (युवान) आणि इंद्र (मघवा) यांना एकत्र गुंफले आहे!
(टीप: हा उल्लेख व्याकरणशास्त्रावर आधारित आहे; पाणिनीच्या सूत्रात या शब्दांची रूपे एकाच नियमाने चालतात).

The ignorant tie glass, gems, and gold in a single string (They tie together totally incompatible things --good and bad) —what is so surprising about that? Even the thoughtful Panini, in a single grammatical rule (Sutra), linked together a dog (shvan), a youth (yuvan), and Lord Indra (maghavan)!

हर्तुर्याति न गोचरं किमपि शं पुष्णाति यत्सर्वदा
अर्थिभ्य: प्रतिपाद्यमानमनिशं प्राप्नोति वृद्धिं पराम्।
कल्पान्तेष्वपि न प्रयाति निधनं विद्याख्यमन्तर्धनं
येषां तान्प्रति मानमुज्झत नृपाः कस्तैः सह स्पर्धते।।३८०।।

जे चोराला दिसत नाही, जे सर्व प्रकारे कल्याण करते, जे गरजूला सतत दिल्याने अधिकच वाढते आणि कल्पाच्या शेवटीही ज्याचा नाश होत नाही, असे 'विद्या' नावाचे गुप्त धन ज्यांच्याकडे आहे, त्या विद्वानांचा हे राजांनो, तुम्ही अहंकार सोडून सन्मान करा; त्यांच्याशी कोण स्पर्धा करू शकेल?

That inner wealth called knowledge is not visible to the thief; it nourishes all-round happiness; it grows immensely when constantly shared with seekers; and it does not perish even at the end of eons. O Kings, give up your pride toward those who possess it; who can compete with them?
हे पान शेअर करा
QR Code